नवी दिल्ली, भारतात कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे आजपासून ड्राय रन सुरू होत असतानाच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची मोफत लस मिळणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. कोरोनाची लस सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं मेगा प्लॅन तयार केला आहे. आजपासून ड्राय रन देखील केलं जात असतानाच कोरोना लशीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
देशभरातील सर्व भारतीयांना कोरोना लस मोफत दिली जाईल. अशी यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी घोषणा केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आज सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमधील 259 ठिकाणी ड्राय रन सुरू आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वतः दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात जाऊन याबाबत आढावा देखील घेतला आहे. त्यादरम्यान हर्षवर्धन यांनी ही घोषणा केली आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच शुक्रवारीची लस तातडीच्या वापरासाठी परवानगी मिळण्यास हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. लशीबद्दल निर्णय घेण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने याबाबतचा अहवाल दिला असून पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्ड लशीसाठी सशर्त परवानगी द्यायला हरकत नसल्याचं सांगितलं आहे.