शासनाच्या योजनांचा लाभ घ्यायचाय? उत्पन्नाचा दाखला मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

शासनाच्या विविध योजना, शिष्यवृत्त्या आणि वैद्यकीय सहाय्यासाठी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला आवश्यक ठरतो. हा दाखला मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, कोणते कागदपत्रे लागतात आणि ऑनलाइन अर्ज कसा करायचा, हे आपण येथे सविस्तर पाहूया.

उत्पन्नाचा दाखला कशासाठी आवश्यक असतो?

राज्य आणि केंद्र शासन अनेक सामाजिक आणि शैक्षणिक योजना राबवतात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असणे आवश्यक असते. त्यामुळे, शिष्यवृत्ती, वैद्यकीय मदत किंवा इतर सवलती मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागतो.

हा दाखला तुम्ही तुमच्या परिसरातील तहसील कार्यालयातील ‘सेतू केंद्र’ किंवा ‘आपले सरकार’ या पोर्टलवरून मिळवू शकता.

दाखल्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे

1. ओळखीचा पुरावा (एक आवश्यक):

  • पॅन कार्ड

  • आधार कार्ड

  • पासपोर्ट

  • मतदान ओळखपत्र

  • ड्रायव्हिंग लायसन्स

  • सरकारी ओळखपत्र (फोटोसह)

  • रोजगार हमी योजनेचे कार्ड

2. पत्ता दर्शवणारा पुरावा (एक आवश्यक):

  • आधार कार्ड

  • रेशन कार्ड

  • मतदान कार्ड

  • पाणी/वीज बील

  • घरफळा पावती

  • सातबारा / 8अ उतारा

  • ड्रायव्हिंग लायसन्स

3. वैद्यकीय कारणासाठी:

  • वैद्यकीय अधिकारी दिलेले प्रमाणपत्र (फक्त वैद्यकीय सहाय्यासाठी आवश्यक)

4. स्वघोषणापत्र:

  • उत्पन्नासंबंधी स्वघोषणा, अर्जासोबत अनिवार्य

5. उत्पन्न सिद्ध करणारी कागदपत्रे:

  • प्राप्तिकर परताव्याचे प्रमाणपत्र

  • मंडल अधिकाऱ्यांचा तपास अहवाल

  • नोकरदारांसाठी फॉर्म 16

  • पेन्शनधारकांसाठी बँकेचे प्रमाणपत्र

  • शेतकऱ्यांसाठी 7/12 आणि 8अ उतारे

आपले सरकार पोर्टलवर अर्ज कसा करायचा?

  1. नोंदणी करा:
    ‘आपले सरकार’ पोर्टलवर नवीन वापरकर्त्याची नोंदणी करा. नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी टाकून लॉगिन तयार करा.

  2. सेवा निवडा:
    लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्डवर “महसूल विभाग” निवडा, त्यानंतर “महसूल सेवा” आणि मग “उत्पन्नाचा दाखला” किंवा “मिळकतीचे प्रमाणपत्र” निवडा.

  3. कागदपत्रांची तयारी:
    आवश्यक कागदपत्रांची यादी वाचा आणि ती 75KB ते 500KB आकाराच्या PDF फॉर्ममध्ये तयार ठेवा. फोटो आणि सहीसुद्धा अपलोड करावी लागते.

  4. अर्ज सादर करा:
    संपूर्ण माहिती भरून सर्व कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क ऑनलाइन भरा. त्यानंतर मिळणारी पावती सेव्ह करून ठेवा.

प्रमाणपत्र कधी मिळेल?

अर्ज सादर केल्यानंतर साधारणतः 15 दिवसांच्या आत उत्पन्नाचा दाखला पोर्टलवर मिळतो. जर या कालावधीत दाखला मिळाला नाही, तर पुन्हा ‘आपले सरकार’ पोर्टलवर लॉगिन करून ‘अपील अर्ज’ सादर करता येतो.